गुहागर : उन्हाळ्याच्या सुटीत सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबाला वेळ द्यावाच लागतो. मात्र, सरकारी उच्चाधिकारी म्हणून छाप पाडून कौटुंबिक सहलींमध्ये प्रवासात शासकीय वाहनांबरोबर डॅशबोर्डवर शासनाचे फलक अनधिकृतपणे मिरवत सरकारीबाबंूचे आॅनड्युटी पर्यटन मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे.सरकारी वाहनांचा वापर शासकीय कामकाज वा दौऱ्यांसाठीच करायचा असतो. मोठ्या संख्येने सरकारी अधिकारी हा शिरस्ता पाळतातच. कामावर येण्यासाठीही सरकारी गाडी वापरायची नाही, असे तत्व पाळणारे काही वरिष्ठ अधिकारी यापूर्वी आपण पाहिले आहेत. मात्र, चक्क रजेवर असताना कौटुंबिक सहलीसाठी शासनाच्या गाड्या उडवणारे तसेच गाड्यांवर शासकीय बोर्ड मिरवत बाबूगिरी दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. कुटुंबासमवेत गुहागरच्या पर्यटनासाठी येणाऱ्या अनेक वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन असे बोर्ड पाहावयास मिळतात. गुहागरात अशा अनेक गाड्यांमधून अधिकारी सध्या पर्यटनाचा आनंद लुटत फिरत आहेत.अधिकारी पदांचा गैरवापर करणाऱ्या या सरकारी बाबूंवर निर्बंध कोण घालणार? असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारी वाहनांवरील या फलकांमुळे मार्गात येणारे सर्व टोल माफ, रग्गड पगार घेऊन टोल बुडवेगिरी करण्यात आणि त्याची गंमत आपल्या पाहुण्यांना व कुंटुबीयांना दाखवण्यात या बाबूंना कोण आनंद मिळतो. प्रवासात समोरच्या वाहन मालकांची चूक नसली तरी हे फलक पाहून नमते घेतले जाते. विविध ठिकाणची सरकारी चेकपोस्ट, सरकारी कार्यालये, विश्रांतीगृह या ठिकाणी फुकटचा पाहुणचार आणि मानमरातब स्वीकारला जातो. सर्वसामान्य नागरिकांना किरकोळ गोष्टींसाठी नियमांवर बोट ठेवणारी सरकारी यंत्रणा या बाबूगिरीवर कशी नियंत्रण आणते, याकडे लक्ष आहे. (वार्ताहर)
सरकारी बाबूंचे आॅनड्युटी पर्यटन
By admin | Updated: May 26, 2015 00:53 IST