दापोली : शाळा प्रत्यक्ष दोनच महिने भरू शकली, जास्तीत जास्त ऑनलाईन कॉन्फरन्स कॉलच्या मदतीने मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कोरोना काळातही संकटावर मार्ग काढून मुलांचे शिक्षण थांबणार नाही, असे नियोजन शाळेतील शिक्षकांनी केले. जिद्द, चिकाटीच्या जोरावर ऑनलाईन शिक्षणाद्वारेही चांगले शिक्षण देता येऊ शकते, हे जिल्ह्यातील एक उत्तम उदाहरण असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी बळवंतराव यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आठवीच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मळेने दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे काैतुक करताना ते बाेलत हाेते. शाळेतील निखिल सुरेश पांदे, अथर्व अजय फिलसे यांनी यश मिळवले. सलग चार वर्षे दापोलीत सुरू असलेल्या ‘व्हिजन दापोली’ या उपक्रमामुळे हे यश मिळाल्याचे मुख्याध्यापक दिनेश चिपटे यांनी सांगितले. या यशात मुख्याध्यापक दिनेश चिपटे, सहशिक्षक प्रकाश पाते आणि केंद्रप्रमुख प्रवीण काटकर यांचा वाटा असल्याचे वर्गशिक्षिका सुरेखा कारखेले यांनी सांगितले. विस्तार अधिकारी कल्याणी मुळ्ये यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे काैतुक केले आहे.