जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील पर्शुराम दूध उत्पादन संस्था जाकादेवी व कोल्हापूर दूध उत्पादन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जाकादेवी-आगवे येथील पर्शुराम दूध उत्पादन संस्थेतर्फे गोकुळ दूध शीतकरण केंद्र सप्टेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार आहे. या शीतकरण केंद्रात जाकादेवी दशक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध विक्रीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष सुधीर देसाई यांनी केले आहे.
जाकादेवी-आगवे या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ व जाकादेवी येथील पर्शुराम दूध उत्पादक संस्था जाकादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने आगवे या ठिकाणी आधुनिक स्वरूपाचे गोकुळ दुग्ध शीतकरण केंद्र उभारण्यात आले आहे. रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर, देवरूख परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईचे व म्हशीचे दूध या शीतकरण केंद्रामध्ये संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्शुराम दूध उत्पादक संस्था व कोल्हापूर दूध उत्पादक संघ, कोल्हापूर यांच्यामार्फत जाकादेवी आगवे या मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक स्वरूपाचे गोकुळ दुग्ध शीतकरण केंद्र उभे राहिले आहे. या केंद्रामध्ये ग्रामीण व कष्टकरी भागातील शेतकऱ्यांना गाईचे व म्हशीचे दूध या शीतकरण केंद्रामध्ये संकलनासाठी एक चांगली सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हे गोकुळ दूध शीतकरण केंद्र अनेकांना फायदेशीर ठरणार आहे.
या शीतकरण केंद्रामध्ये दुधाला चांगला भाव मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जाकादेवी आगवे या केंद्रापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांना या दूध संकलन केंद्राचा जरूर लाभ मिळणार आहे. या दूध शीतकरण केंद्राच्या उभारणीसाठी संस्थेचे अध्यक्ष सुधीर देसाई, सचिव प्रमोद उर्फ आबा देसाई, संचालक श्रीकांत सावंत, पोचरी गावचे प्रतीक देसाई हे प्रयत्नशील आहेत.
---------------
जाकादेवी आगवे हे ठिकाण रत्नागिरी तालुक्यासह गुहागर विभागातील तसेच संगमेश्वर देवरूख परिसरातील अनेक दूध उत्पादक या संस्थेशी संलग्न असल्याने या शीतकरण केंद्रामध्ये दररोज दहा हजार लिटर दूध संकलन करण्याचा मानस आहे.
- सुधीर देसाई, अध्यक्ष, पर्शुराम दूध उत्पादक संस्था