मंडणगड : कोविड काळात निर्माण झालेल्या विविध समस्या मार्गी लावण्यात याव्यात याकरिता माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मंडणगड तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
खासगी कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना आर्थिक साह्य मिळावे, तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त जनतेचे नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्यांना शासनाची मदत मिळावी. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना भात बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे याचबरोबर
पेट्रोल, गॅस, खते इंधन दरवाढ थांबवावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही सादर करण्यात आलेल्या चार निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार संजय कदम, सायली कदम यांच्यासह तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, राष्ट्रवादीचे भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, दीपक घोसाळकर, सुभाष सापटे, मोबीन परकार, राजा लेंढे, दत्ता दळवी, राकेश साळुंखे, अनिल घरटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोविड काळात विविध कारणांनी सर्वसामान्यांचे जीवन त्रस्त झाले आहे़ यात खासगी रुग्णालयात निरुपायाने उपचार घ्यावा लागणाऱ्या जिल्ह्यांतील रुग्णांना भरमसाट बिले आकारली गेली आहेत़ खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार करून अनेक लोक बरे झाले आहेत़ त्यांचे उपचार बिलापोटी शासनामार्फत आर्थिक साहाय्य तातडीने मिळावे. तौक्ते चक्रीवादळात तालुक्यातील सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील जनता आधीच बेजार आहे़ देव्हारे, पंदेरी, बाणकोट पंचक्रोशीसह तालुक्यातील आंबा फळाचे वादळाने व पावसाने नुकसान झाले आहे़ त्याचा पंचनाम करून शासकीय नुकसानभरपाई मिळावी. राॅकेलही उपलब्ध नाही. दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा शाखेकडून निषेध करत दरवाढ मागे घेण्याची मागणी कऱण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्र शासनाचा विरोध करणारे आंदोलन असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोकणातील खरीप हंगामातील भातशेतीकरिता संकरित आणि सुधारीत बी पेरणीकरिता जिल्हा नियोजन विकास निधीमधून अखर्चित निधी खर्च जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानातील बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
----------------------
माजी आमदार संजय कदम व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी विविध प्रश्नांवरील निवेदन निवासी नायब तहसीलदार मंगेश आंबेकर यांच्याकडे दिले़