गौरी ही समृद्धीची आणि धान्याची देवता आहे. पिढ्यानपिढ्या एकाच विशिष्ट गणपती कारखान्यामधून आपल्याला हवी तशी मूर्ती घडवून घेण्याची प्रथा अनेक कुटुंबांत आहे. यातूनच मूर्तिकार व गणेशभक्त कुटुंबीय यांच्यातील ऋणानुबंध दृढ होतात. कोकणातील गणपती सण हा कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुण्यांची वर्दळ, मुलांची धम्माल, जुन्या पिढीच्या पूर्वजांचे स्मरण करणाऱ्या गप्पा, नाच-गाण्यांची बेधुंद करणारी जागरणं, सासर-माहेरची माणसं एकत्र येणं, असा हा गौरी-गणपतीचा सण ऊर्जावर्धक आहे. ही ऊर्जा पुढे वर्षभरासाठी उपयोगी पडते.
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरीचे व्रत करण्यात येते. गौरी पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी पाणवठ्यावरचे प्रतीकात्मक पाच खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. काही ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार केली जाते आणि त्यावर मातीचा मुखवटा चढविण्यात येतो. मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजविण्यात येते. गौरी सजविल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसविली जाते. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढण्यात येतात. थाटामाटात घरात आणताना प्रत्येक पावलांवर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान केले जाते.
गौरीपूजनात पाना-फुलांची आरास करण्यात येते. शेवंतीची वेणी माळण्यात येते. ताज्या फुलांचे हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान अर्पण केले जाते. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करण्यात येते. तिला महानैवेद्य अर्पण केला जातो. माहेरी आलेल्या गौरीला विविध प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण गौरीला वरणापुराणाचा नैवेद्य दाखविण्यात येतो. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ केले जातात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजित करण्यात येतो. रात्री झिम्मा-फुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून गौरी जागविली जाते. नवविवाहितांचे ‘ओवसे’ करण्यात येतात. ओवशामध्ये फळे, फराळांचे पदार्थ ठेवले जातात. माहेरी व सासरी ओवसा देण्याचेही प्रकार आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये एकूणच उत्साह संचारलेला असतो.
तिसऱ्या दिवशी खीरचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करण्यात येते. परंपरेनुसार मुखवटे हालविण्यात येतात, गणेशमूर्तीसह गौरीचे विसर्जन करण्यात येते. परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरविण्यात येते. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येते. काही ठिकाणी गौरीसह गणपतींचे तर, काही ठिकाणी गौरींचे विसर्जन करण्यात येते. मात्र गणपती विसर्जनावेळी भाविक दु:खी होतात. जड अंत:करणाने निरोप दिला जातो. मुलगी सासरी जाताना जी भावना निर्माण होते, तशीच अवस्था विसर्जनाच्या वेळी भाविकांची होते. पाच-सहा दिवस भक्तिभावनेने पूजा करणाऱ्या, उत्सव साजरा करणाऱ्या भाविकांना अक्षरश: अश्रू आवरेनासे होते. मात्र तरीही ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा संदेश देत बाप्पाला निरोप दिला जातो. गौरी आणताना असलेला उत्साह विसर्जनावेळी मात्र सरतो.