गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे विकेंड लॉकडाऊनमुळे मंदिर परिसरात शांतता पसरली आहे. येथील हॉटेल्स बंद करण्यात आली असून, काही ठिकाणी दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.
विकेंड लॉकडाऊनमुळे पर्यटकच तीर्थक्षेत्रात नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी आपापली हॉटेल्स बंद केली आहेत. त्यामुळे हॉटेल्समधील कामगारांना त्यांचा झालेला पगार देऊन घरी पाठविण्यात आले आहे. मात्र, या कामगारांना आता मिळालेल्या पगारात दोन महिन्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. मात्र, पुढे असाच लॉकडाऊन वाढल्यास पुढे हे कामगार करणार काय? असा प्रश्न या कामगारांसमोर उभा राहिला आहे. जर लॉकडाऊन वाढला तर रोजीरोटीसाठी कोठे ना कोठे काम करण्याचा पर्याय या कामगारांना शोधावा लागणार आहे.
सोमवारी रात्रीपासून स्वयंभू गजाननाचे मंदिर भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आल्यानंतर मंदिर परिसरात पूर्णपणे शांतता पसरली आहे. समुद्र चौपाटी पूर्णपणे ओस पडली असून, वॉटर स्पोर्टस् धारकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील काही गरीब महिला मंदिर परिसरात हार विक्रीचा व्यवसाय करत असत. मात्र, मंदिर दर्शनासाठी बंद झाल्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळणार हे नक्की.