खेड : येथील युवा सेनेच्यावतीने दि. १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील गणपती सजावटीचे फोटो नाव व पत्ता यांच्यासह सिद्धेश खेडेकर, दर्शन महाजन, राकेश सागवेकर, प्रसाद पाटणे, सौरभ चाळके यांच्याकडे १८ सप्टेंबरपूर्वी पाठवावेत.
वसुली मोहीम जोरात
रत्नागिरी : दीड वर्षात कोरोनामुळे नगर परिषदेची घरपट्टी वसुलीची मोहीम थंडावली आहे. आतापर्यंत ८ कोटींची वसुली झाली असून, अजूनही ६ कोटींची थकबाकी आहे. सध्या नगर परिषदेने घरपट्टी थकबाकी वसुलीची जोरदार मोहीम सुरु केली आहे. दररोज ५०० घरांना नोटीस बजावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
गर्भवतींना पौष्टिक खाद्य
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाकडून कुपोषणग्रस्त गर्भवती मातांना पौष्टिक खाद्य पुरवले जाणार आहे. या आहारात लाडू तसेच सुकामेवा यांचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून ही योजना राबवली जाणार आहे. जिल्हा परिषदेकडून तसे नियोजन करण्यात येत आहे.
दारुची चोरटी विक्री
दापोली : तालुक्यातील गावतळे येथे गावठी दारुबरोबरच देशी - विदेशी दारुची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री केली जात आहे. या व्यावसायिकांवर संबंधित खात्याचे नियंत्रण नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. गावातील या अवैध दारुच्या विक्रीमुळे वादाचे प्रकार घडू लागले आहेत. हे व्यावसायिक कुठलाही परवाना नसताना विदेशी दारुही विकत आहेत.
अजूनही बाजारात शांतता
रत्नागिरी : गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. या उत्सवाची तयारी भक्त मोठ्या उत्साहाने करत आहेत. परंतु, सध्या वाढलेली महागाई आणि अजूनही कोरोनाचे असलेले अनिष्ट सावट याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर झाला आहे. सध्या बाजारपेठा गणेशोत्सवासाठी सज्ज झाल्या असल्या तरी अजूनही व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.