लांजा : येथील नगरपंचायत कार्यक्षेत्रातून गवाणे व रामाणे ही गावे वगळण्यात आल्याची अधिकृत घोषणा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी केली होती. आता सोमवारी शासनाने गवाणे व रामाणे ही गावे नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे पत्र नगरपंचायतीला धाडल्याने गवाणेवासीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.लांजा ग्रामपंचायतीची नगरपंचायतीमध्ये रुपांतर होऊन जवळजवळ दिड वर्षे उलटून गेले आहे. नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये कुवे, गवाणे, रामाणे गाव प्रथम समाविष्ट करण्यात आला होता. त्यावेळी गवाणेवासियांनी नगरपंचायतीमधून आपले गाव वगळण्यात यावे, यासाठी प्रखर विरोध करत आपल्या हरकती प्रशासनाकडे दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने येथील ग्रामस्थांच्या हरकतीचा मान ठेवत गवाणे, रामाणे गाव नगरपंचायतीमधून वगळण्यात आल्याने सहा महिन्यापूर्वी जाहीर केले. त्यानुसार या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक यांच्याकडे सोपविण्यात आला होता.जवळजवळ दिड वर्षे गवाणे गावचा विकास थांबला होता. तसेच गवाणेवासियांना लागणारे विविध दाखले मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. नगरपंचायतीमधून गवाणे व रामाणे गाव वगळण्यात आल्यानंतर सीओनी गटविकास अधिकारी यांना नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी गवाणे ग्रामपंचायतीचे प्रस्तावदेखील पाठविण्यात आले आहेत.गवाणे, रामाणे गाव लांजा नगरपंचायतीमधून वगळण्यात आले असतानादेखील पुन्हा नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे पत्र नगरपंचायतीला प्राप्त झाल्याने शासनाविरुद्ध गवाणेवासियांचा तीव्र भावना झाल्या असून अगोदर ही गावे वगळूनही पुन्हा नव्याने समानिष्ट केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.शासन गवाणे गावातील ग्रामस्थांच्या भावनांशी खेळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत याविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. (प्रतिनिधी)सोमवारी शासनाचे नगरपंचायतीला आले पत्र.गवाणे व रामाणे गावे नगरपंचायतीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांच्या तीव्र प्रतिक्रिया.शासन गवाणेतील ग्रामस्थांच्या भावनांशी खेळत असल्याचा गवाणे ग्रामस्थांनी केला आरोप.
गवाणे, रामाणे पुन्हा नगर पंचायतीत?
By admin | Updated: September 15, 2014 23:19 IST