हणमंत यादव - चाफळ , येथील स्मशानभूमी शेडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसेच येथे विजेचीही सोय नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी कंदील, बॅटरी अथवा दिव्याच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. परिणामी, चाफळवासीयांना मरणानंतरही मरणयातना सोसाव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीसह, लोकप्रतिनीधींनी याकडे कानाडोळा केल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चाफळची राजकीय सत्तास्थाने परस्पर विरोधी गटांमध्ये विभागलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य म्हणून राजेश पवार तर जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून डी. बी. वेल्हाळ हे देसाई गटाचे नेतृत्व करत आहेत. ग्रामपंचायतसुध्दा देसाई गटाच्याच ताब्यात आहे. असे असताना या दोन्ही नेत्यांना स्वत:च्या गावातील स्मशानभूमी शेडसाठी निधी मिळवता येत नसल्याने विभागात हा विषय चर्चेचा ठरू लागला आहे. सध्या येथील स्मशानभूमी शेडचा पत्रा पूर्णपणे सडला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत पाणी साचत आहे. यातच पावसात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे पाण्यासह विजेची सोय नाही. ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत सौरऊर्जा दिवे देण्यात आले होते, मात्र याठिकाणी एकही सौरदिवा न बसविल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना रॉकेलचे दिवे बनवून अंत्यविधी करावा लागत आहे. नवीन स्मशानभूमी शेडसह सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामपंचायतीसह या दोन्ही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी शेडसाठी निधीची तरतूद करुन रस्ता, वीज, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, नातेवाइकांना थांबण्यासाठी इमारत बांधून परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.- धोंडिराम हिंंदोळे, ग्रामस्थसातारा जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करताना ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर अडचणींमध्ये आणखीनच भर पडते. खाचखळग्यांनी भरलेला रस्ता, कोसळणारा पाऊस, ना विजेची सोय ना निवारा अशा दिव्यातून नदीकाठी जाऊन भरपावसात उघड्यावर अग्निसंस्कार करावा लागतो. विविध गावच्या स्मशानभूमींच्या अशा प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारी ‘स्मशानभूमीच्या मरणयातना’ ही मालिका ‘लोकमत’ आजपासून सुरू करीत आहे.
कंदिलाच्या उजेडात करावे लागतायत अंत्यसंस्कार- स्मशानभूमीच्या मरणयातना...
By admin | Updated: August 5, 2014 00:09 IST