असगोली : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचविलेल्या कामांपैकी १३ कामे मंजूर झाली आहेत. या कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ७३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी दिली. ही कामे मंजूर केल्याबद्दल आरेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले.
गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे विकास कामांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी १३ कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जिल्हा वार्षिक साकव दुरुस्ती योजनेमधून पालशेत घुरटवाडी येथे साकव बांधण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. जिल्हा नियोजनमधून चिखली स्वामी समर्थ मठ ते मुख्य आरोग्य केंद्र रस्त्याचे डांबरीकरणासाठी ५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. मुख्य आरोग्य केंद्राची इमारत झाली. त्यावेळी बांधलेला हा रस्ता पूर्णपणे उखडला होता. त्यातच महामार्गाची उंची वाढल्याने महामार्गावरून आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतरणे धोक्याचे बनले होते.
पर्यटन विकासासाठी जिल्हा वार्षिक नियोजनांतर्गत काही निधी खर्च करायचा असतो. गुहागर तालुक्यातील तवसाळ काशविंडा बीच सुशोभीकरण, वेळणेश्वर मंदिराचे सुशोभीकरण आणि पडवे गणेश मंदिर सुशोभीकरणाचे काम पर्यटन विकास अंतर्गत करावे, अशी मागणी गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. त्यालाही खासदार तटकरेंच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली आहे. तवसाळ, वेळणेश्वर आणि पडवे येथील या कामांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनमधून निधी मंजूर झाला आहे.
जनसुविधा योजनेंतर्गत पडवे स्मशान शेड, तवसाळ आगर स्मशान शेड आणि चिंद्रावळे येथे सफळेवाडी, गावडेवाडी, गराटेवाडी या तीन वाड्यांसाठी एक स्मशान शेड बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी दिली.