राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रायपाटण येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळे व नास्ता वाटप करण्यात आला. खापणे महाविद्यालयालगतच हे सेंटर असून, या सेंटरमध्ये सध्या ६५ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला हाेता.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, मुख्य लिपिक नरेश पाचलकर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयातर्फे सर्व रुग्णांना मास्कचे वाटप केले होते. त्याचबरोबर महाविद्यालयाने पाण्याची सुविधाही या सेंटरला उपलब्ध करून दिली आहे. पाणीसाठ्यासाठी टाक्याही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर नेट सेवाही उपलब्ध करून दिली होती. या उपक्रमाचे काैतुक करण्यात येत आहे.