शृंगारतळी : गुहागर येथून भातगावमार्गे रत्नागिरीला जाणाऱ्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या तीन कोटी २९ लाख रूपये निधीच्या पुलांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याशिवाय अन्य चार मोठ्या पुलांचे काम लवकरच सुरू होणार आहे. ही कामे झाल्यानंतर वाहनचालकांचा प्रवास सुखकर होणार आहे. दापोली, गुहागर येथील वाहनचालकांसाठी भातगावमार्गे रत्नागिरीला कमी वेळेत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गामुळे इंधन व वेळेची बचत होते. वाहनांची वर्दळ कमी असल्याने सुदैवाने अद्याप मोठा अपघात झालेला नाही. रस्ता ठिकठिकाणी वळणदार असल्याने वाहनचालकांना वाहने सावकाश चालवावी लागतात, त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर संपूर्ण रस्ता हिरवागार जंगलातून जात असल्याने निर्सगाचे विहंगम दर्र्शन पाहायला मिळते. तळीपासून बहुतेक ठिकाणी चांगला व रूंद रस्ता आहे. मात्र, आबलोली, काजुर्ली येथे काही ठिकाणी रस्ता बराच खराब झाला आहे, तो दुरूस्त होण्याची गरज असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. या मार्गावर तीन कोटी २९ लाख रूपये निधी खर्च करून ठेकेदारामार्फत तळी ते भातगावच्या दरम्यान या पुलांचे काम सुरू आहे. याव्यतिरिक्त काही ठिकाणी लहान पुलांची कामे करण्यात आली आहेत. अर्थातच दिवसेंदिवस हा मार्ग आता वाहनचालकांसाठी सुखकर बनत चालला आहे़ सध्या ज्या कामांची सुरूवात आहे, ती कामे दर्जेदार होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता, चिपळूण व उपविभाग, गुहागर येथील अधिकाऱ्यांनी आतापासूनच लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात या पुलाच्या निर्मितीमुळे अवजड वाहनांची वाहतूक होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. (वार्ताहर)-दापोली, गुहागर येथील वाहनचालकांसाठी भातगावमार्गे रत्नागिरीला कमी वेळेत जाण्याचा सुखकर मार्ग.-तीन कोटी २९ लाख रूपये निधी खर्च करून तळी ते भातगावच्या दरम्यान या पुलांचे काम सुरू.-काही ठिकाणी लहान पुलांची कामे करण्यात आली आहेत.
गुहागर-रत्नागिरी मार्गावर होणार चार मोठे पूल
By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST