प्रवेश सुरू
दापोली : येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयातील केंद्रांतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पावती अभ्यास केंद्रावर जमा करावी.
चिखल हटवला
देवरूख : संगमेश्वर व कोंडअसुर्डे येथे महापुराचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला असल्याने गाळ व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. आमदार शेखर निकम यांनी महामार्गावरील ठेकेदार कंपनीशी चर्चा करून साचलेला गाळ व चिखल साफ करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार बाजारपेठ परिसरातील गाळ काढण्यात आला आहे.
गुणवंतांचा सत्कार
रत्नागिरी : देव-घैसास-कीर (डीजीके) कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभागांतर्गत गुणगाैरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिक्षण मंडळाच्या उपकार्याध्यक्ष नमिता कीर, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, गुरूकुल प्रबंधक मनोज जाधव उपस्थित होते.
मोफत आराेग्य शिबिर
दापोली : दापोली जैन समाज, रामराजे काॅलेज, दापोली, दापोली शहर व्यापारी संघटना, ए. जी. हायस्कूल, दापोलीच्या १९९५ व १९९६च्या दहावी बॅचमधील विद्यार्थ्यांनी चिपळूण पेठमाप भागात मोफत टी. टी. इंजेक्शन, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. दोन हजार नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
मदतीपासून वंचित
खेड : तालुक्यातील अलसुरे, निळीक, चिंचघर, आंबवली, बिरमणी, पाेसरे, चोरवणे व चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते, खेर्डी, दळवटणे, सती ही गावेही पुरामुळे बाधित झाली आहेत. शहरात मदतीचा ओघ सुरू झाला असला तरी ग्रामीण भागातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित आहेत. नळपाणी योजनाही बाधित झाल्याने पिण्याचे पाणीही मिळेनासे झाले आहे.
भातशेतीचे नुकसान
दापोली : तालुक्यातील मुरूड येथे खालची पाखाडी समुद्राच्या उधाणाचे पाणी किनाऱ्यावरील शेतात शिरून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येथील किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी होत आहे. वारंवार येथील शेतकऱ्यांना उधाणाच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे बंधारा बांधून शेतीचे रक्षण करण्याची मागणी होत आहे.
छावा प्रतिष्ठानकडून मदत
रत्नागिरी : छावा प्रतिष्ठानने आवाहन केल्यानुसार जमा झालेली मदत चिपळुणातील पूरग्रस्तांना वितरीत करण्यात आली आहे. चटई, पाणी बाटल्या, बिस्किट पुडे, मेणबत्ती, माचीस आदी साहित्य देण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुनील धावडे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, सदस्य मुकेश धावडे, सचिन धावडे उपस्थित होते.
याचिकांची सुनावणी
रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयातील ईपीएस पेन्शनर्सच्या ६० याचिकांची सुनावणी दि. ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. ईपीएस पेन्शनर्सच्या सहभागामुळे केशव दळवी, ॲड. आनंद लांगड यांच्या माध्यमातून दि. १९ व २२ मार्च रोजी दोन भागात सर्वोच्च न्यायालयात इंटरव्हेन्शन दाखल केले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात दि. ११ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
प्रशालेची पाहणी
गुहागर : तालुक्यातील काजुर्ली येथील डाॅ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीची माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी पाहणी केली. यावेळी संस्थेच्या भावी उपक्रमांविषयी अध्यक्ष सुनील मयेकर यांनी माहिती दिली. सचिव विनायक राऊत, मुख्याध्यापक अमोल पवार यावेळी उपस्थित होते.