रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाळा सुरु झाला असला तरी दूषित पाण्यामुळे साथींच्या आजारांचा कुठेही उद्रेक न झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यावेळी सुटकेचा श्वास घेतला आहे. तरीही पावसाळ्यात साथ उद्रेक होण्याच्या शक्यतेने जिल्ह्यातील ९१ गावांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. त्यासाठी जिल्ह्यात आरोग्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नैसर्गिक आपत्ती व पूरस्थितीमध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने पाऊस सुरु होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आखली होती. सन २०१३मध्ये पावसाळ्यात रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा, दापोली तालुक्यातील जालगाव आणि तेरेवायंगणी येथे तापाचे रुग्ण आढळून आले होते. त्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर ते डेंग्यूचे रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी या गावांमध्ये आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली होती. मात्र, सन २०१४च्या पावसाळ्यात जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळलेले नाहीत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.डेंग्यू, चिकुनगुन्या, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, तापसरीचा उद्रेक, हिवताप, काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा उद्रेक झालेल्या गावांबाबत आरोग्य विभागाने सतर्कता बाळगली आहे. या गावांवर आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पावसाळ्यासाठी संभाव्य पूरग्रस्त भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच या गावांना आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षक वेळोवेळी भेटी देऊन नियमित रोगविषयक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे पुरेसा औषधसाठा ठेवण्यात आला आहे. घरोघरी मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला पावसाच्या पाण्याबरोबर वर्षभराची घाण विहिरी, तलाव आदींमध्ये वाहून गेल्याने तेथील पाणी दूषित होते. पावसाचे पाणी तसेच पुराचे पाणी विहिरींमध्ये घुसल्याने पाणी प्रदूषित होते. या काळात उलटी, जुलाब, ताप, सर्दी असे विविध आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्य विभाग या काळात विशेष दक्ष असतो. यंदा आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे पावसाच्या दूषित पाण्यामुळे जिल्ह्यात कुठेही साथीचे आजार पसरले नसल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. (शहर वार्ताहर)
पहिला टप्पा निर्धोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2015 00:28 IST