जाकादेवी : विद्यार्थ्यांचे अर्ध्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन म्हणजे सहामाही परीक्षा काही शाळांनी अक्षरश: उरकल्याचे चित्र परिसरात आहे. जाकादेवी परिसरातील काही माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यांकन करणाऱ्या सहामाही अर्थात प्रथम सत्र परीक्षा दिवाळीपूर्वी पूर्ण करणे आवश्यक असते. किंबहुना तशा प्रकारचे जिल्हास्तरावर शिक्षण खाते आणि शाळांचे मुख्याध्यापक यांनी एकत्रित केलेले नियोजन असते. मात्र, १५ सप्टेंबरच्या दरम्यान अचानक लागलेली आचारसंहिता त्याचबरोबर जाहीर झालेला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, त्याचसोबत निवडणुकीसाठी शिक्षकांचे घेण्यात येणारे प्रशिक्षणवर्ग या सर्वांमुळे पहिल्या सत्रातील शेवटचा महिना शैक्षणिकदृष्ट्या अक्षरश: धामधुमीचा गेला. शिक्षक याद्या, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा त्यामुळे पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम कसाबसा पूर्ण झाला. पहिली ते आठवीच्या वर्गात मागे कुणाला ठेवायचे नाही, असा बालकांच्या शिक्षणाचा कायदा सांगतो. त्यामुळे पाल्यांबरोबर शिक्षकांनाही अभ्यासक्रम आणि परीक्षा याबाबत विशेष देणे-घेणे आहे, असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना निवडणुकीमुळे कामावर शिक्षकांना जावे लागले व दिवाळी सुट्टीपूर्वी पहिले सत्र पूर्ण करायचे असल्याने ही घाई करण्यात आली. त्यामुळे ज्या सहामाही परीक्षा झाल्या, त्या प्रत्येक शाळेने आपापल्या मर्जीप्रमाणेच घेतल्याचे समजते. जिल्हा नाहीतर तालुका किंवा केंद्रस्तरावरसुद्धा त्यामध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा शिक्षकवर्गात आहे. काही शाळांनी या परीक्षा ६ ते १३ आॅक्टोबर या कालावधीत घेतल्या. काही शाळांनी ६ आॅक्टोबरला परीक्षा सुरु केल्या. दि. १४ ते १६ अशी पेपरला सुटी दिली. कारण बहुतांश शिक्षक निवडणूक कामासाठी काढल्यामुळे काही शाळांनी ६ ला परीक्षा सुरु केल्या आणि त्या दि. १८ आॅक्टोबरला शेवटचा पेपर घेतील व परीक्षा संपेल. शिक्षण खात्याने हा परीक्षेचा सावळा गोंधळ भविष्यात थांबवावा, अशी पालकांची चर्चेतून मागणी पुढे येत आहे. पहिले सत्र १८ ला संपत आहे. यावेळी निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना सुट्टी सुरु होण्यापूर्वी शेवटपर्यंत शाळेत जावे लागले. (वार्ताहर)
पहिले सत्र संपले सहामाही ‘उरकल्या’
By admin | Updated: October 17, 2014 00:39 IST