रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे औद्योगिक वसाहतीतील एच. पी. पॉलिमर अॅण्ड रिक्लेम इंडस्ट्रीजला आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता भीषण आग लागली. यात कंपनीतील मशिनरी व अन्य तयार साहित्य जळून खाक झाले. या आगीत कंपनीचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी नऊ वाजता लागलेली ही आग अग्निशामकांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या कंपनीत रबरावर प्रक्रिया करून रिमोल्ड टायर्स व अन्य उत्पादने बनविली जातात. सोमवार असल्याने कंपनीला साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे केवळ वॉचमन कंपनीच्या प्रवेशद्वारावर होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या शेडमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. वरच्या बाजूच्या खिडक्यांमधून आगीचे लोळही बाहेर दिसू लागताच वॉचमनने तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला याबाबतची खबर दिली. ते लगेचच घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दोन अग्निशामक बंबांनी दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आतील दोन मशीन्स जळून खाक झाल्या होत्या. बॉयलरही जळून गेला होता. शनिवारी रात्री कर्मचाऱ्यांनी रबर बनविण्यासाठी पावडर तयार करून बॉयलरच्या जवळ ठेवली होती. या पावडरनेच पेट घेतल्याने हा आगीचा भडका उडाल्याचे सांगण्यात आले. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
रबर कारखान्याला आग
By admin | Updated: June 10, 2014 01:26 IST