रत्नागिरी : येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुतीगृह वॉर्डमध्ये विजेच्या शॉटसर्किटमुळे गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास विद्युत वायर्सचे जाळे पेटले. त्यामुळे प्रसुतीगृहातील २७ बाळांसह ६३ महिला काही काळ धुराच्या लोळात सापडल्या. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाने तत्काळ हालचाली करीत प्रसुतीगृहातील २७ बाळांसह सर्वांनाच अवघ्या काही मिनिटात जवळच असलेल्या नेत्ररुग्ण विभागाच्या इमारतीत हलविले. त्यामुळे सर्वजण सुखरुप बचावले. अग्नीशामकाद्वारे आग तत्काळ आटोक्यात आणली गेली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. तातडीने शेजारीच असलेल्या पालिकेच्या अग्नीशामकास पाचारण करण्यात आले. तोवर काहींनी जळणाऱ्या विद्युत वायर्सला लागलेली आग वाळूच्या सहाय्याने आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नंतर अग्नीशामक बंबाने काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत धुराच्या लोळात सापडलेल्या ६३ जणांना कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर जाण्याच्या दुसऱ्या मार्गाने नेत्रविभागात नेण्यात आले. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी छोट्या बाळांना धुराचा त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने प्रसुतीगृहातील महिला भयभीत झाल्या होत्या. याबाबत माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नारोळे म्हणाले की, प्रसुतीगृह असलेल्या इमारतीवरील स्लॅबवर लाद्या बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना वरील स्लॅबवर ड्रिलिंग करण्यात आले होते. त्यामुळे स्लॅबमधून प्रसुतीगृहाच्या पुढील भागात वायरिंग बोर्ड असलेल्या ठिकाणी पाण्याची गळती सुरु झाल्याची कल्पना आपण संबंधित ठेकेदाराला दिली होती. त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासह सांगितले होते. या गळणाऱ्या पाण्यामुळेच शॉर्टसर्किटची ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत पत्र देण्यात आले आहे. (प्रतिनिधी) चौकट ..अन बाळांची झाली तपासणी अचानकपणे घडलेले शॉर्टसर्किट व त्यामुळे पेटलेल्या वायर्स आणि झालेला धूर यामुळे प्रसुतीगृहातील छोट्या बाळांना काही त्रास झाला असण्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे नेत्र विभागात नेण्यात आलेल्या बाळांची बालरोग तज्ज्ञ डॉक्टर्सनी तत्काळ तपासणी केली असता त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याची माहिती तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिल्याचे डॉ. नारोळे म्हणाले.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुतीगृहात आग
By admin | Updated: October 17, 2014 22:17 IST