चिपळूण : बामणोली गावात एका गोठ्याला आग लावल्याची घटना गुरुवारी घडली. या आगीत गोठ्यात बांधलेल्या एक गाय गंभीररीत्या जखमी झाली असून, संपूर्ण गोठा जळून खाक झाला आहे. याप्रकरणी एका संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश बाबू शिगवण (४५, रा. बामणोली-तांबेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद प्रभाकर शंकर कोंडविलकर (५८, बामणोली-तांबेवाडी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडविलकर यांचा त्यांच्या घराच्या पाठीमागे गोठा आहे. गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शिगवण याने या गोठ्याला आग लावली. या आगीत गोठ्यात बांधलेली एक गाय होरपळल्याने जखमी झाली आहे, तसेच या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला आहे. हा प्रकार कोंडविलकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यानुसार शिगवण याच्याविरोधात गुरुवारी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.