रत्नागिरी : शासनाने निराधार व्यक्तींना देऊ केलेल्या दोन महिन्यांच्या आर्थिक साहाय्यासह अन्य एका महिन्याचे अनुदान शहरानजीकच्या कुष्ठरुग्ण वसाहतीतील निराधारांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी येथील एम.आय.डी.सी. पोस्ट कार्यालयाचे कर्मचारी देवीदास पल्लेवाड आणि पोस्टमन विनायक लिंगायत यांनी बुधवारी पूर्ण केली. यासाठी ‘लोकमत’ने तसेच सोशल आस्था फाउंडेशन या संस्थेने येथील पोस्ट कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
विशेष योजनेच्या लाभार्थ्यांना लाॅकडाऊन काळात शासनाने दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ दिले आहे. कोरोनाकाळात या व्यक्तींना बाहेर पडायला लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील पोस्ट कार्यालयाला या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन हातात पैसे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे पैसे गेल्या महिन्यात जमा झाले आहेत. मात्र, काही भागात अजूनही पोस्टमन गेले नसल्याने हे लाभार्थी कित्येक दिवसांपासू या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. लाॅकडाऊन सुरू असल्याने त्यांना बाहेरही पडता येत नसल्याने त्यांची उपासमार होत होती.
जिल्हा प्रशासनाकडे माहिती घेता, या निराधारांचे निवृत्तीवेतन शासनाकडून आले असून, ते तालुकास्तरावर पाठविण्यात आले होते. त्यानुसार कोषागार कार्यालयाकडून थेट त्यांच्या पोस्टाच्या खात्यातही पैसे जमा झाले आहेत. लाॅकडाऊन काळात पोस्टाने त्यांच्यापर्यंत पोहोचून ही रक्कम त्यांना द्यावी, अशा सूचना जिल्हास्तरावरून तालुक्यातील पोस्ट कार्यालयांनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, पोस्टमनच्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते.
याबाबत ‘लोकमत’ने, तसेच आस्था सोशल फाउंडेशनने याबाबत पोस्ट कार्यालयाकडे संपर्क केला. अखेर येथील एम.आय.डी.सी. येथील पोस्ट कार्यालयाचे कर्मचारी देवीदास पल्लेवाड व विनायक लिंगायत हे बुधवारी सकाळी कुष्ठरुग्ण वसाहतीत पोहोचले आणि सुमारे १५ ते १६ निराधारांना इंडियन पोस्टल पेमेंटस् बँकेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे तीन महिन्यांचे मिळून एकूण ४७ हजार रुपयांचे वाटप केले. यावेळी पत्रकार राजेंद्र चव्हाण हेही उपस्थित होते.
निराधारांना माेफत मास्कचेही वाटप
कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाही देवीदास पल्लेवाड व विनायक लिंगायत यांनी कुष्ठरुग्ण वसाहतीत जाऊन या निराधारांना त्यांचे पैसे सुपुर्द केले. यावेळी या दोघांनी सुमारे ३० निराधार व्यक्तींना मोफत मास्कचे वाटप केेले. यावेळी या वृद्धांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पसरला होता. या वृद्धांनी ‘देव तुमचे रक्षण करो’ अशी प्रार्थनाही केली. त्यामुळे हे दोघेही भारावून गेले.