रत्नागिरी : शिमगोत्सव सरता सरता कुष्ठरुग्ण वसाहतीतील निराधारांना शासनाच्या विशेष साहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या आर्थिक लाभाची रक्कम तब्बल चार महिन्यांनंतर मिळाली आहे. हातात पैसे आल्याने आता या वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.
शहरानजीकच्या उद्यमनगर परिसरातील कुष्ठरुग्ण वसाहतीत सुमारे २० निराधार स्त्री - पुरूष राहतात. यात निराधार महिलांची संख्या अधिक आहे. सातजणी ७० वर्षांवरील आहेत. हे रुग्ण बरे होऊनही त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना न स्वीकारल्याने वर्षानुवर्षे या व्यक्ती या वसाहतीतच राहत आहेत. सरकारच्या विशेष साहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ आदी योजनांमधून त्यांना महिन्याला १००० रुपये अनुदान दिले जात आहे. वृद्धापकाळ तसेच दुर्धर आजार यामुळे त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या या १००० रुपयांच्या आर्थिक लाभावर अवलंबून राहावे लागते. दैनंदिन गुजराण तसेच आजारपणात उपचाराचा खर्चही त्यांना या रकमेतून करावा लागतो.
हे रुग्ण दुर्धर व्याधीग्रस्त असल्याने ते पोस्टात किंवा या बँकेत जात-येत नाहीत. ही त्यांची समस्या लक्षात घेऊन रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी या लाभार्थ्यांचे पैसे पोस्टात जमा होताच, ते तातडीने त्यांना घरपोच करावेत, असे पत्र रत्नागिरीतील पोस्ट पेमेंट बँक, तसेच डाकघर अधीक्षक, पोस्टमास्तर यांना १० डिसेंबर २०२० रोजी दिले होते.
कोरोना काळात काही महिने या लाभार्थ्यांचे वेतन अनियमित झाले होते. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर २०२० ते जानेवारी, फेब्रुवारी २०२१ असे चार महिन्यांचे वेतन पोस्टात जमा झाले होते. मात्र, या कालावधित या वसाहतीत पोस्टमनच न फिरकल्याने त्यांचे पैसे पोस्टातच अडकले होते. हातात पैसाच नसल्याने जगायचं कसं, ही विवंचना त्यांना पडली. यापैकी काही वृद्धांवर मारुती मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली.
याबाबत सातत्याने ‘लोकमत’मधून पाठपुरावा केला जात होता. अखेर पोस्ट खात्याला जाग आली असून पोस्टमनने या वसाहतीत जाऊन या निराधारांना हे वेतन दिले. त्यामुळे त्यांना हायसे वाटले असून पोस्ट खात्याला धन्यवाद देण्यात येत आहेत.