खेड : शहरातील डाक बंगला येथील धोकादायक स्थितीतील वीजखांब बदलण्याबाबत महावितरणकडे सातत्याने तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. ही बाब नागरिकांनी भाजपचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भाजपच्या तक्रारीची तातडीने दखल घेत डाक बंगला येथील पाच वीजखांब बदलण्यात आले.
डाक बंगला परिसरात गंजलेल्या वीजखांबांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. रहिवाशांनी महावितरणकडे सातत्याने वीजखांब बदलण्यासाठी खेटे घालत निवेदनही दिले. मात्र, वीजखांब बदलण्यासाठी महावितरणला सवड मिळत नव्हती. अखेर परिसरातील रहिवाशांनी ही बाब भाजपचे शहराध्यक्ष कानडे यांना सांगितली. परिसरातील धोकादायक स्थितीतील खांबांमुळे धोका पोहोचण्याची दाट शक्यता होती. याविषयी तक्रारी करुनही महावितरणला जाग येत नव्हती. त्यामुळे कानडे व पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला तसेच अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास भाग पाडले. यानंतर महावितरणने तातडीने येथील वीजखांब बदलण्याचे काम हाती घेतले असून, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.