गणपतीपुळे : तीर्थक्षेत्रात सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात येताना दिसत असून, या पर्यटकांना येथील काही व्यावसायिक आपल्या लाॅजिंगमध्ये खोल्या देताना असल्याचे दिसत आहे. यापुढे असे रुग्ण दिलेले लाॅजधारकांवर पोलीस प्रशासनाद्वारे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
उपसरपंच महेश केदार यांनी सांगितले की, सध्या मंदिर बंद आहेत. तरी गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात परजिल्ह्यातून चारचाकी, दुचाकी आदी वाहने घेऊन पर्यटक दर्शनासाठी येऊ लागले आहेत. गणपतीपुळे येथील काही लाॅज व्यावसायिक या पर्यटकांना लाॅजमध्ये प्रवेश देत आहेत. त्या पर्यटकांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. ग्रामपंचायतीकडे आलेल्या तक्रारीनुसार या लाॅजधारकांना पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र पुन्हा अशा प्रकारे दिसून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत येथील पोलिसही सतर्क झाले असून, लाॅज भाडेतत्त्वावर दिले जात असेल असे आढळल्यास अशा लाॅजमालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जयगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी सांगितले.