गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आरोग्य आणि पोलीस यंत्रणा विशेष खबरदारी घेत आहेत. यादृष्टीने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन नागरिकांकडून करण्यात येऊ नये, यासाठी पोलिसांकडून कारवाईची जोरदार मोहीम सर्वत्र राबविण्यात येत आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडूनही उपलब्ध झालेले लसींचे डोस एकाच दिवशी वितरित करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात १५० सरकारी आणि ९ खासगी केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दिवसाला अगदी २७ हजार डोस देण्याची क्षमताही आरोग्य विभागाची आहे.