चिपळूण : कोकणच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. येथील प्रत्येक प्रश्नासाठी आपला पाठपुरावा सुरुच राहील. कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी व्हावा, ही आपली आग्रही मागणी आहे. अजून नागोठणे येथील अपघाताचा अहवाल बाहेर यायचा आहे. परंतु रेल्वेच्या विविध समस्यांबाबत आपण आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असा इशारा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नीलेश राणे यांनी दिला. आपण सव्वा लाखाच्या मताधिक्याने विजय होऊ, असा विश्वासही राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. असुर्डे येथील रेल्वे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खासदार राणे चिपळुणात आले होते. त्यावेळी माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम, तालुकाध्यक्ष संदीप सावंत, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, पाणीपुरवठा सभापती कबीर काद्री, बंटी वणजु, समीर झारी, इरशाद वांगडे, रामदास राणे, राजेश वाजे, संतोष खैर, सतीश घाग, कुंदन खातू, फैसल पिलपिले आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, कोकणच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने लढा देणारच आहोत. कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत. असुर्डे रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अशा अनेक प्रश्नांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा ठेवणारच आहोत. दुहेरी मार्ग असता तर नागोठणेसारखा अपघात झाला नसता, असे मत खासदार राणे यांनी व्यक्त केले. आता मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत यंत्रणा कामाला लागली आहे. सर्वेक्षण किंवा भूसंपादन याबाबतची कामे सुरू झाली आहेत. या कामाला आपण अधिक गती देणार आहोत. अवकाळी पावसाबाबत बोलताना ते म्हणाले की, या परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरली. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांबरोबर स्वतंत्र बैठक घेऊ व शासकीय यंत्रणेला योग्य त्या सूचना देऊ, असे राणे यांनी सांगितले. नीलेश राणे यांनी या मतदारसंघात निवडणुकीनंतर मतदार संपर्क केला. त्यानंतर वादळसदृश परिस्थिती व महावितरण कंपनीला दिलेल्या सूचनांनंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण मोठ्या मतानी लोकसभेत जाऊ, असा आत्मविश्वास व्यक्त केला. दि. १६ रोजी निकाल लागल्यानंतर आपल्याला कळेल की, मतदार विकास संपर्कालाच प्राधान्य देत आहेत. राणे यांनी दिलेल्या भेटीमुळे कार्यकर्ते सुखावले आहेत. (प्रतिनिधी)
कोकण रेल्वेच्या प्रश्नांबाबत लढा सुरूच राहणार : नीलेश राणे
By admin | Updated: May 14, 2014 00:33 IST