खेड : दापोली विधानसभा मतदार संघात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पन्नास यंत्र दाखल झाली असून, आगामी कालावधीत आठ रुग्णवाहिकाही मिळणार आहेत, अशी माहिती दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी दिली.
मंगळवारी खेडमधील सभापती निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, सभापती मानसी जगदाळे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय जाधव, शैलेश कदम, सचिन धाडवे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण दगावत होते. मोठ्या शहरात रुग्णालयामध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्राची उपलब्धता असते. या परिस्थितीत ग्रामीण भागात लोकांचे जीव वाचवायला उपयोगी पडू शकतात, हे हेरून आपल्या आमदार निधीतून दापोली विधानसभा मतदार संघासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पन्नास यंत्र खरेदी करण्याचा निर्णय आपण घेतला. ती यंत्रे दापोली मतदार संघात दाखल झाली आहेत. या प्रत्येक यंत्राची क्षमता दहा लीटरची असून, एका यंत्रातून दोनजणांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. ज्या कोरोना बाधितांना रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतरही ऑक्सिजनची गरज भासते, अशा रुग्णांना मोफत घरी वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र सेवा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एका विधानसभा मतदार संघात एवढया मोठ्या संख्येने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र उपलब्ध होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी, असे ते म्हणाले.
दापोली मतदार संघात कोरोना साथ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असून, त्यामध्ये काम करणारे रुग्णवाहिका चालक, वॉर्डबॉय, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी इत्यादी सर्वच कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या मतदार संघात उभारलेल्या शिवतेज कोविड केअर सेंटरचा २५० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज आहोत. ही लाट थोपवण्यासाठी रुग्णालयामध्ये वीस टक्के खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. जे बालरोगतज्ज्ञ खासगी सेवा देत आहेत, त्यांना सरकारी रुग्णालयासोबत जोडून घेण्याची विनंतीही आपण आरोग्य यंत्रणेला केली आहे, असे ते म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीमुळे खेड, दापोली व मंडणगड या प्रत्येक तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका, तर राज्य सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या ५०० रुग्णवाहिकांपैकी दोन खेडसाठी, दोन दापोलीसाठी आणि एक मंडणगड तालुक्यासाठी अशा एकूण आठ रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.