रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिरजवळील हिंदू कॉलनीत १६ एप्रिलला भरदिवसा विनायक घाडी या तरुणाचा भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी आणखी एक आरोपी तुषार अरविंद चौगुले (वय २०, मांडवी, दत्तमंदिरजवळ, रत्नागिरी) याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. त्यानेच विनायकला धारदार हत्याराने भोसकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नेरसे, बेळगाव येथून आलेला विनायक घाडी व त्याचे अन्य कुटुंबीय गेल्या २० वर्षांपासून रत्नागिरीजवळील नाचणे-शांतीनगर येथे राहत आहेत. विनायक हा गेल्या काही वर्षांपासून इमारत बांधकाम व्यवसायात सिमेंट प्लास्टरिंगचे काम करीत होता. हिंदू कॉलनीतील ठाणेदार अपार्टमेंटच्या प्लास्टरिंगचा ठेका त्याने स्वतंत्रपणे घेतला होता. गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते. त्या तरुणीचेही विनायकवर प्रेम होते. मात्र, तरुणी ज्याला मित्र मानत होती त्या रुपेश बिर्जे याचेही तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. विनायक हा त्याच्या मार्गातील अडथळा ठरला होता. अजून दोन संशयित?विनायक घाडी खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ संशयित आरोपींना अटक झाली आहे. त्यातील काही आरोपी अजूनही उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मात्र, त्यांच्याकडून या खून प्रकरणाचा पूर्ण उलगडा नक्कीच होईल. याप्रकरणात आणखी एक किंवा दोन संशयित आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी दिली.
खून प्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत
By admin | Updated: April 20, 2015 00:03 IST