चिपळूण : कामथे उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टर मारहाणप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाली असून, तिला रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याबाबत न्यायालयाने सूचना केल्या आहेत.
याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही महिलांची पोलीस कोठडी गुरुवारी संपल्यावर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दोघींनाही रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात पाठविण्यात आले होते. महिला न्यायाधीन बंदी कारागृहात दाखल करण्यापूर्वी कोरोना आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याने तिची कोरोनाची चाचणी करण्यात आली हाेती. त्याचा अहवाल दि. १० मे राेजी प्राप्त झाला. त्यामध्ये एक महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल या कारागृहास प्राप्त झाला असल्याचे रत्नागिरी विशेष कारागृह अधीक्षकांनी कळवले आहे.
मुळात संबंधित महिलांनी गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ज्या डॉक्टरांच्या बाबतीत हा प्रकार घडला, तेव्हा ते कोविड सेंटरमधून बाळाची डीएनए घेण्यासाठी आले होते. तसेच त्यांनी मास्क व अन्य सुरक्षितता बाळगली नव्हती, असा आरोप केला होता. त्यानंतर आता त्या महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.