रत्नागिरी : आंबा नुकसानभरपाईचे वाटप जिल्ह्यात अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत नुकसानाच्या पंचनाम्याबाबतही आक्षेप घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्यासह उदय बने, विलास चाळके, विश्वास सुर्वे यांच्यासह उर्वरित सदस्य व सर्व अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सध्या सगळीकडे आंबा नुकसानभरपाईचे वाटप सुरू आहे. या वाटपाबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. हे वाटप संथगतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक बागायतदारांपर्यंत भरपाई अजून पोहोचलेली नाही. आता नव्याने आंबा हंगाम सुरू होत आहे. या काळात जर बागायतदारांना भरपाई मिळाली तर नव्या हंगामातील औषध फवारणीसाठी त्या पैशाचा उपयोग होऊ शकेल, त्यामुळे या कामाला गती द्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. आंबा नुकसानाच्या अनेक पंचनाम्यांवर संबंधित बागायतदारांच्या सह्याच नसल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. जर सह्याच नसतील तर पंचनामे खरे आहेत की नाहीत, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली. हे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आक्षेपही यावेळी सदस्यांनी घेतला. (शहर वार्ताहर) पावणेसहा वाजले; तरीही सभा सुरुच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पावणेसहानंतर थांबू नये, असे तोंडी आदेश देण्यात आले असल्याने सर्वसाधारण सभा तब्बल तीनवेळा पावणेसहा वाजता संपवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी स्थायी समितीची सभा मात्र सव्वा सात वाजेपर्यंत चालवली. त्यामुळे प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समझोता झाल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.
भरपाई वाटपावर तीव्र नाराजी
By admin | Updated: October 30, 2015 23:27 IST