अडरे : आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळण्याकरिता उत्पादन तंत्राबरोबरच काढणीपश्चात तंत्रज्ञान, शेतमालाची योग्य काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग व प्रक्रिया याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रकल्प संचालक सुधीर चव्हाण यांनी केले आहे. चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबवण्यात येत असून, आंबा व काजू पिकाचे उत्पादक शेतकरी तसेच प्रक्रिया व निर्यातदार उद्योजकांचे खरेदीदार विक्रेता संमेलन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, डॉ. वैभव शिंदे, जयवंत विचारे, कोकण फळ प्रक्रिया उद्योगाचे अध्यक्ष धनंजय यादव, मंडणगडचे शेतकरी दिनेश पेडणेकर, धनंजय शिगवण, सुभाष पवार आदी उपस्थित होते. कृषी विभागाच्या एम. आय. डी. एच. यांत्रिकीकरण, आय. डब्ल्यू. एम. पी., मँगोनेटसारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेऊन पॅकहाऊस प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून आपल्या शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे यांनी केले आहे. मृदसंधारण संशोधन केंद्र, आवाशीचे डॉ. वैभव शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सध्याच्या हवामान परिस्थितीमध्ये आंबा व काजूचे उत्पादन घेण्याकरिता समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. एकाच पिकावर अवलंबून न राहता पिकांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पर्यायी पिकाची जसे काळीमिरी, कोकम, फणस व इतर भाजीपाला मसाला पिकांची लागवड करुन त्याच्यावर योग्य प्रक्रिया करुन चांगल्या प्रकारचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला राजापूर, रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, गुहागर येथील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास जाधव यांनी केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शेतीमालाला चांगला भाव गरजेचा
By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST