लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : शासनाने एकीकडे रासायनिक खतांच्या दरवाढ केली असून, दुसरीकडे अनुदान देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांना एक प्रकारचे गाजरच दाखविले आहे. रासायनिक खतांची दरवाढ व डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. शेतीला लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
गेल्या महिनाभरात शासनाने पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत वाढ केली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्व बाबींना बसत असून, याची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. पूर्वी सर्वसामान्य ते मोठा शेतकरी असो ते बैलजोडीच्या सहाय्याने शेती करीत होते. मात्र, आधुनिक यंत्रणेला आता डिझेल पेट्रोलची गरज भासत असल्याने खर्च जास्त व वेळ कमी लागत आहे. त्यामुळे आताचा शेतकरी आधुनिकीकरणाकडे वळला आहे.
इंधन वाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच रासायनिक खत उत्पन्न करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या खतांच्या दरात वाढ केली आहे. शेतातील जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होत चालल्याने उत्पन्न कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा आधार घेतला. मात्र यावर्षी रासायनिक खते व डिझेलच्या दरात वाढ झाली असतानाच मजुरीत ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्वांचा ताळमेळ बसवताना नाकीनऊ आले आहेत . शेतीत मिळणारे उत्पन्न कमी व खर्च जास्त यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत.