मंडणगडच्या शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: June 1, 2017 11:12 PM2017-06-01T23:12:23+5:302017-06-01T23:12:23+5:30
मंडणगडच्या शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : कर्ज फेडण्यासाठी बँकेने तगादा लावल्याने वेरळ तर्फ नातूनगर (ता.मंडणगड) येथील बुध्ददास लक्ष्मण साळवी (वय ५८) या शेतकऱ्याने बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमाराला राहत्या घराच्या छपराला गळफास घेऊन आत्महत्या केली. कोकणातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. आत्महत्येनंतर रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष आदेश मर्चंडे यांनी बँक व्यवस्थापनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
बुद्धदास यांचा मुलगा भीमराज साळवी यांनी मंडणगड पोलिसांत फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुद्धदास साळवी यांनी बँक आॅफ इंडियाच्या मंडणगड येथील शाखेकडून एक लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाचे हप्ते त्यांना वेळच्या वेळी भरता येत नव्हते. कर्ज फेड करण्यासाठी बँकेकडून वसुलीचा तगादा लावला जात होता. बुधवारी त्यांना बँकेची नोटीसही देण्यात आली होती. तसेच हप्ते भरण्यासाठी वारंवार फोनही येत होते. यामुळे ते निराश होते. बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमाराला त्यांनी राहत्या घराच्या छपराला गळफास घेऊन आत्महत्या केली. साळवी यांच्या मृतदेहाचे विच्छेदन दापोली उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. साळवी यांच्या पश्चात पत्नी भारती आणि परेश, भीमराज, पुष्पराज ही तीन मुले आहेत. यातील परेश महाड एमआयडीसीमध्ये एका कंपनीत काम करतो.
दोन वर्षांपूर्वी बाग आगीत खाक
साळवी यांनी आपल्या घरापासून दूर असलेल्या नदीजवळील जागेत आंब्याची लागवड मोठ्या आशेने केली होती. मात्र, ती आशाही त्यांची अधुरीच ठरली. २०१४ मध्ये वणव्यामुळे आंबा कलमे जळून खाक झाली. आधीच आर्थिक संकटात सापडलेले बुद्धदास साळवी आणखीनच संकटात सापडले.
चिंता वाढत होती
वडिलांना मदत म्हणून माझ्या नोकरीच्या पगारातून कर्जाचा हप्ता भरू, असा दिलासा वडिलांना दिला होता. मात्र, वडिलांची चिंता कमी होत नव्हती. याच कठीण परिस्थितीमुळे आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे परेश साळवी याने सांगितले.
तीन वर्षांपूर्वी घेतले कर्ज
आंबा पिकासाठी तीन वर्षांपूर्वी बँक आॅफ इंडियाकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्यापैकी एकही हप्ता त्यांनी भरलेला नव्हता. त्यांच्यावर १ लाख २६ हजारांचे कर्ज होते, अशी माहिती बँक व्यवस्थापनाने दिली.