चिपळूण : तालुक्यात दीड दिवसांच्या बाप्पाला शनिवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. तालुक्यात ठिकठिकाणी विसर्जन स्थळावर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत विसर्जन करण्यात आले.
तालुक्यात शुक्रवारी १६,५०० गणपतींच्या मूर्तींची घराघरात स्थापना करण्यात आली. यातील शहरात दीड दिवसांच्या दीडशे मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी लहान मुले गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणून पुढच्या वर्षी लवकर या अशी बाप्पांना हाक देत होते. मात्र यावेळी कुठेही मिरवणूक व गाजावाजा न करता शांततेत विसर्जन करण्यात आले. ठराविक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आपल्या परिवारासह काहीजण विसर्जन स्थळी दाखल झाले होते. शहरातील बाजार पूल, बहाद्दूरशेख नाका येथे श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी उशिरापर्यंत हा सोहळा सुरू होता.