चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात दरड कोसळल्याचा व्हिडिओ साेमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांच्या उरात धडकी भरली. काहींनी चक्क कामथे घाटात धाव घेतली. मात्र, या घाटात दरड कोसळल्याची कोणतीही घटना घडली नव्हती. अखेर संबंधित व्हिडिओ कामथे घाटातील नसल्याची खात्री पटल्यानंतर अनेकांनी सुस्कारा सोडला.
सध्या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चिपळूण ते आरवलीदरम्यान काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. विशेषतः कामथे घाटात संरक्षक भिंत व अन्य काम पावसाळ्यातही सुरू ठेवली आहेत. या कामामुळे कामथे घाटात जागोजागी डोंगर कटाई केल्याने तुर्तास दरडीचा धोका निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात चार भले मोठे दगड रस्त्यावर आल्याने धोका निर्माण झाला होता. तातडीने जेसीबी मागवून रस्त्यावर आलेले दगड हटवण्यात आले. या दरडीच्या वरील बाजूस कामथे-हरेकरवाडी येथील १३ कुटुंबियांना दरडीचा धोका आहे. यावर्षीही त्यांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे. अशातच सोमवारी कामथे घाटात दरड कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ इतका भीषण आहे की, तो पाहून अनेकांना धडकी भरली. ‘कामथे घाट कोसळला’ असा उल्लेख या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी कामथे घाटात जाऊन पाहणी केली. मात्र, घाटात गेल्यानंतर सर्व काही सुरळीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या व्हिडीओविषयी काहींनी खातरजमा केली असता, हा व्हिडिओ बनाव असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी काहींनी सोशल मीडियावर ही घटना ज्योतिबा कोल्हापूरची आहे म्हणून सांगत होते, तर काहीजणांनी पुरंदर जवळील व्हिडिओ असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर रात्री उशिरापर्यंत याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. साेशल मीडियावर अफवा पसरविणारे व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
--------------------------
‘कामथे घाट काेसळला’ असे लिहिलेला व्हिडीओ व्हायरल केल्याने अनेकांनी भीती व्यक्त केली हाेती.