रत्नागिरी : आठवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याच्या योजनेंतर्गत जिल्ह्यात आठवीचे सहाशे वर्ग सुरु होणे अपेक्षित आहे. मात्र, ज्या माध्यमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग आहेत, ते बंद करण्याचा कोणताही उद्देश नाही. त्यामुळे माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच शाळेत ठेवावे, की जवळच्या प्राथमिक शाळेत सुरु होणाऱ्या नवीन वर्गात दाखल करावे, हा त्यांच्या पालकांचा निर्णय असेल, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या ९६३ शाळा आहेत, तर पहिली ते पाचवीपर्यंतच्या २७४६ शाळा आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परिसरात शाळा उपलब्ध व्हावी, हा आठवीचा वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्यामागील उद्देश आहे. सातवीपर्यंत गावात शाळा आहे आणि आठवीसाठी परगावी जावे लागते, अशी अवस्था असेल तर अनेकदा मुले पुढील शिक्षणासाठी पाठवली जात नाहीत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या ठिकाणी शालेय शिक्षण घेता यावे असा या योजनेचा उद्देश आहे. जिल्हा परिषदेमार्फत एक किलोमीटरच्या आत विद्यार्थ्यांना पाचवीचे वर्ग व तीन किलोमीटर परिसरात आठवीचे वर्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या अंतराच्या आत अन्य शाळा नसतील तर तेथे हे वर्ग उपलब्ध करुन देणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी राहील, असेही कुलकर्णी म्हणाले. जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग चालविण्यासाठी प्राथमिक शाळांचे विद्यार्थी आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न काही ठिकाणी सुरू आहेत. तर काही ठिकाणी प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या गटात आठवीचा वर्ग घेतल्याने हा वर्ग सुरू करण्याची धडपड सुरू आहे, याबाबत विचारता ते म्हणाले, अशी स्थिती काही ठिकाणी असू शकते. परंतु मार्ग निघेल. (प्रतिनिधी)
आठवीचे सहाशे वर्ग अपेक्षित
By admin | Updated: June 27, 2014 01:11 IST