लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : तालुक्यातील देवाचेगाेठणे - साेगमवाडी येथे मृतक विधी केल्याच्या कारणावरून कुटुंबावर बहिष्कार टाकल्याची घटना ताजी असतानाच आता श्राद्ध विधीच्या जेवणात चिकन, मटणच हवे असा फतवाच महाळुंगे गावात काढण्यात आल्याचे समाेर आले आहे. चिकन, मटणाचे जेवण न केल्यास त्या कुटुंबाला बहिष्कृत केले जात असल्याची धक्कादायक बाब समाेर येत आहे. ग्रामस्थांना वेठीस धरणाऱ्या या प्रकारांची चाैकशी करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे.
देवाचेगोठणे सोगमवाडी येथे मृत व्यक्तीचा धार्मिक विधीप्रसंगी भावकीने बहिष्कृत केल्याच्या तक्रारीप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी उपविभागीय दंडाधिकारी राजापूर यांना दिले आहेत; मात्र प्रांत प्रशासन या कारवाईसाठी चालढकल करीत असल्याची नवी तक्रार करण्यात आली आहे. याबाबतची माहिती तक्रारदार सदानंद झिंबरे यांनी दिली आहे. देवाचेगोठणे सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे व समस्त झिंबरे भावकी यांनी सोगमवाडीतील काही ग्रामस्थांच्या विरोधात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयाकडून उपविभागीय दंडाधिकारी राजापूर यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत .
हा प्रकार पुढे आला असतानाच यंदा २१ सप्टेंबरपासून महालयारंभ श्राद्ध विधीला सुरुवात होत आहे. यावेळी ग्रामीण भागात ग्रामस्थ व गावकर यांना आमंत्रित केले जाते. अशा विधीला गावकराची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. गेल्या वर्षापासून महाळुंगे गावात श्राद्धासाठी नवीन प्रथा सुरू करण्यात आली आहे. कोंबडी किंवा मटण हे श्राद्ध जेवणात असेल तरच गावकर व ग्रामस्थ उपस्थित राहता. मात्र,काहींना कोंबडी किंवा मटण श्राद्धाला ठेवले नाही तर त्यांना बहिष्कृत करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. याबाबत लोक पोलीस पाटलाकडे तक्रार करण्यास गेल्यास पोलीस पाटील हात वर करून माेकळे हाेतात. शासन अथवा पोलीस यंत्रणेने अशा अन्यायी बाबींसाठी असलेल्या सेलद्वारे गुप्तप्रकारे पोलीस पाटील व प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत या प्रकारांची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.