दापोली : शहराकडून मौजे दापोलीकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या डोंगरावर खोदकाम करण्यात आल्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे माती रस्त्यावर आली. यामुळे वाहतुकीला अडथळा व हा रस्ता धोकादायक बनला होता. मात्र, आता या रस्त्यावरील माती हटविण्यात आली आहे.
मौजे दापोली मार्गावर एक बांधकाम व्यावसायिकाने डोंगरी भागात खोदकाम केले आहे. त्याची माती रस्त्यालगत टाकली आहे. त्यात वादळ व झालेल्या पावसाने सर्व माती वाहून रस्त्यावर आली होती. सर्वत्र चिखल झाला आहे. भाजपच्या नगरसेविका जया साळवी यांनी दापाेली नगर पंचायतीकडे कळवून या बांधकाम व्यावसायिकाला बोलावून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील माती मोकळी करून घेतली. यावेळी ॲड. ऋषिकेश भागवत, संदीप केळकर, रोहित शिंदे, स्वरूप महाजन, अजय शिंदे, प्रमोद पांगारकर उपस्थित होते. रस्त्यावर माती आल्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. मात्र आता ही माती रस्त्यावरून बाजूला करण्यात आल्याने वाहनचालक व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.