चिपळूण : कर्करोगाच्या प्रकारामध्ये अन्ननलिकेचा कर्करोग हा आठव्या क्रमांकावर आहे. अन्ननलिकेशी संबंधित त्रासाची लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. मात्र, जर अन्ननलिकेचा कर्करोग थोडा मोठा झाला अथवा इतरत्र पसरला तर वजन कमी होणे, रक्ताची उलटी होणे, सतत अपचन होणे, खोकला व आवाजात घोगरेपणा आदी लक्षणे दिसतात, अशी माहिती ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. धीरज खडकबाण यांनी दिली.
डाॅ. खडकबाण यांनी सांगितले की, अतिमद्यपान आणि धूम्रपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन, आहारात हिरव्या पालेभाज्यांचा अभाव, खारवलेले अथवा साठवलेले अन्न खाणे, आहारात अ, ब, ई जीवनसत्त्वांची कमतरता, मसालेदार आणि खारट पदार्थांचे सेवन ही या आजारामागची कारणे आहेत. कोकणामध्ये अशाप्रकारच्या कर्करोगाने ग्रासलेल्या ६ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये तीन पुरुष व तीन महिला रुग्णांचा समावेश होता. कोकणात अशाप्रकारे पहिल्यांदाच कर्करुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना अवघ्या ७ दिवसांमध्ये रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे डाॅ. खडकबाण यांनी सांगितले. कर्करोगाचे निदान करण्यासाठी एन्डोस्कोपी व बायोप्सी यांचा समावेश आहे. तसेच कर्करोग इतर भागात किंवा लिंफनोडस (लसिका गाठी)पर्यंत पसरला आहे का, हे जाणून घेण्यासाठी ब्राँकोस्कोपी, एन्डोस्कोपीक अल्ट्रा साऊंड, सिटी स्कॅन, पेट सिटी स्कॅनसारख्या अतिरिक्त चाचण्या केल्या जातात, असेही डाॅ. खडकबाण यांनी सांगितले.