गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सीआयएसएफमधील जवान हरीशकुमार गौड याने गोळीबार करून दोघा सहकाऱ्यांना मारल्यानंतर युनिट प्रमुख मांगा यांनी गौड याला ‘शूट’ करण्याची आॅर्डर दिली. मात्र, एकाही जवानाने ती पाळली नाही. तसेच ही घटना घडल्यानंतर तब्बल १२० जवानांनी येथून पहिल्यांदा पळ काढला. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सीआयएसएफ प्रमुखांनी सर्वांची झाडाझडती घेतली असून, या जवानांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.हरीशकुमार गौड याने गार्ड हॉस्टेलपर्यंत आल्यानंतर पहिल्यांदा पाठीमागील बाजूने बाळू गणपती शिंदे यांच्यावर गोळी झाडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पहिल्यांदा बाजूला असलेल्या १० ते १२ जवानांना गोळी चुकून लागली की जाणीवपूर्वक मारली हे कळलेच नाही. यानंतर गार्ड हॉस्टेलच्या मध्यवर्ती राहून सर्वांवर गौड याने बंदूक रोखली होती; पण गोळीबार केला नाही. त्यानंतर पी. आर. रणीश याला गोळी मारली. अशावेळी अनपेक्षित घटनेमुळे भांबावलेल्या जवानांनी गौड यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न न करता येथून पळ काढला.सर्वसाधारणपणे गार्ड हॉस्टेलबाहेर रेन्ट्रीच्या माध्यमातून पाच जवानांची ड्युटी असते. दर दोन तासांनी यामधील दोन जवान गेट पुढे व पाठी अशी ड्युटी करीत असतात. आपला सर्वांत मोठा वरिष्ठ अधिकारी आला तरी त्याची विशिष्ट पद्धतीने खात्री पटवूनच आतमध्ये घेतले जाते. एवढे अधिकार या रेन्ट्रीमधील पाच जवानांना दिलेले असतात. ही घटना घडल्यानंतर इतर जवानांना रेन्ट्रीने योग्य सूचना देऊनही पुढील घटना टाळण्यासाठी प्रयत्न न करता इतर जवानांबरोबर पळ काढला.या घटनेबाबत त्वरित युनिट प्रमुख मांगा यांना कळविण्यात आले, तेव्हा दोन जवानांचा मृत्यू झालेला होता. अशावेळी गौड याला ‘शूट’ करण्याची आॅर्डर मांगा यांनी दूरध्वनीवरून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्याची तत्काळ अंमलबजावणी झाली नाही आणि त्यानंतरच्या काही काळातच त्याची पत्नी जखमी झाली.या जवानांना सैनिकी पद्धतीने विशेष प्रशिक्षण दिलेले असते. अशा घटनेवेळी जिवाची पर्वा न करता असेल त्या परिस्थितीला तोंड देत लढणे हे पहिले कर्तव्य असताना या जवानांनी पळ काढला व गौड याच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच रेन्ट्रीसह उपस्थित असलेल्या १२० जणांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. (प्रतिनिधी)
‘शूट आऊट’चा आदेश डावलून जवानांचा पळ
By admin | Updated: March 8, 2016 00:32 IST