चिपळूण : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहाेचला आहे. लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांनी लगबग सुरू केली असून, दूरवरच्या मूर्तीकारखान्यातून गुरुवारी गणरायाला घरी आणण्यात आले. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खरेदीसाठीही चिपळूणच्या बाजारात झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत खरेदी केली जात होती. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी भक्तांचा उत्साह मात्र कायम असल्याचे दिसत आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त मुहूर्तांनुसार विधीवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या क्षणाला आता काही तासांचा अवधी उरल्याने सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असल्याने सर्व रस्ते वाहनांनी फुलून गेले आहेत. प्रवाशांची तपासणी नाक्यावर माहिती घेऊन पुढे पाठवले जात आहे.
त्यातच सजावट, रोषणाई आणि बाप्पासाठी नैवैद्य अशी सर्व तयारी करण्यात येत आहे. दूरवरच्या मूर्ती कारखान्यात ऑर्डर करण्यात आलेल्या गणेशमूर्ती एक दिवस अगोदरच घरी आणण्यासाठी गुरुवारी गणेशभक्तांची धावाधाव सुरू होती. दुपारनंतर काहींनी गणेशमूर्ती घरीही आणल्या.
शुक्रवारी गणेश चतुर्थीला गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असल्याने गुरुवारी बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडाली होती. कपड्यांसह फळे, हार, फुले, भाजीपाला, तसेच उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जात होती. ग्रामीण भागातील मंडळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. प्रत्येक दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. त्यामुळे व्यापारी देखील आनंदित दिसून येत होते. महिनाभरापूर्वी उदध्वस्त झालेली चिपळूणची बाजारपेठ आता फुलून आणि झगमगून गेली आहे, तर विघनहर्त्याच्या आगमनापुढे कोरोनाची भीतीदेखील मातीमोल ठरली आहे.
-------------------------
वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
गणेशोत्सवानिमित्ताने येथे वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनही पूर्णतः सज्ज झाले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण, सावर्डे, अलोरे येथील पोलीस स्थानकातही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
-------------------------
बँकांमध्ये रांगच रांग
महापुरात येथील बहुतांशी एटीएम पाण्याखाली गेल्याने आजही एटीएम यंत्रणा कार्यरत झालेली नाही. अनेक एटीएम बंद असल्याने बँकेत जाऊनच पैसे काढावे लागत आहेत. त्यातच मोबाईल व्हॅन एटीएम ‘आऊट ऑफ सर्व्हिस’ असल्याने खरेदीसाठी आलेल्या चाकरमान्यांसह अन्य ग्राहकांचीही पैसे काढण्यासाठी तारांबळ उडाली. काही बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.