राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील वरची पेठ पुलाजवळील रेल्वे स्टेशन तिठ्यावर अपघातग्रस्त कंटेनरमधील साहित्य उचलले गेले नसल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, कंटेनरमधील मासळी उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वैद्यकीय साहित्य भेट
दापोली : तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे किसान भवन येथील कोविड सेंटरला आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले. डिजिटल रक्तदाब मापक यंत्र, थर्मल स्कॅनर, ग्लोव्हज, हेडकॅप्स, मास्क आदी साहित्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सर्वेक्षणास प्रारंभ
रत्नागिरी : सोमेश्वर ग्रामपंचायतीअंतर्गत ‘माझी जबाबदारी, माझी रत्नागिरी’ या मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. सरपंच नाझीया मुकादम, उपसरपंच उत्तम नागवेकर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शिक्षक, आरोग्य व अंंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीसपाटील, तलाठी सहभागी झाले आहेत.
निधी संकलन
राजापूर : तालुक्यातील रेल्वेस्टेशन परिसरातील पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर - मुंबईतर्फे परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुविधा पुरविण्यासाठी निधी संकलन सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राणवायू मशीन तसेच इतर उपयुक्त अत्यावश्यक साहित्य दिले जाणार आहे.
आरोग्य शिबिर
रत्नागिरी : तालुक्यातील पन्हाळी ग्रामस्थ मंडळातर्फे प्राथमिक कोरोना लक्षणे तपासणी शिबिर जिल्हा परिषद शाळा, पन्हळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा प्रारंभ जयगड सागरी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्याहस्ते करण्यात आला. डॉ. आशय जोशी यांनी रुग्णांची तपासणी केली.
आर्यमन माने यांची निवड
गुहागर : ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रमेय प्रदीप आर्यमाने यांची निवड करण्यात आली आहे.