सागर पाटील ल्ल टेंभ्ये संगणक ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. शिक्षकांनी स्वत:ला संगणकदृष्ट्या स्वयंपूर्ण करावे, या हेतूने राज्य शासनाने २००७ मध्ये शासन निर्णय पारित केला होता. परंतु अद्याप अनेक प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी एमएससीआयटी पूर्ण न केल्याने अखेरीस प्राथमिक शिक्षण विभागाने गुरुजींना एमएससीआयटी सक्तीचे केले आहे. प्राथमिक शाळेमधील प्रत्येक शिक्षकाला एमएससीआयटी हा संगणकाचा पायाभूत कोर्स करणे बंधनकारक आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने २००७ मध्ये शासन निर्णय काढला आहे. परंतु अद्याप अनेक शिक्षकांनी एमएससीआयटी करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे जिल्ह्यात शिक्षण विभागाने जुलै महिन्यापर्यंत एमएससीआयटी पूर्ण करण्याचे आदेश शिक्षकांना दिले आहेत. याबाबत आॅडिटरने शिक्षण विभागाच्या आॅडिटमध्ये शेरे मारले असल्याचे समजते. यामुळे जुलै महिन्याअखेरपर्यंत एमएससीआयटी पूर्ण न केल्यास वेतनवाढ थांबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षकांनी संगणक साक्षर होणे ही काळाची गरज आहे. अध्यापनामध्ये संगणकाचा वापर करुन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर करणे आवश्यक आहे. तालुक्यातील प्रत्येक केंद्रशाळेमध्ये संगणक संच व इंटरनेटची सुविधा देण्यात आली आहे. परंतु शिक्षकाला संगणकाचे पायाभूत ज्ञान नसेल तर या प्रणालीचा वापर करणे अशक्य होणार आहे. सध्या अध्यापनामध्ये संगणकाचा वापर सक्तिचा होत आहे. या आदेशामुळे जुलैअखेर जवळपास सर्व प्राथमिक शिक्षक एमएससीआयटीधारक बनतील, न केल्यास शासनाकडून होणार्या पुढील कारवाईस त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
प्राथमिक शिक्षकांना एमएससीआयटी केले सक्तीचे
By admin | Updated: May 24, 2014 01:10 IST