खेड : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जेवढी प्रयत्नशील आहे, तेवढेच प्रयत्न त्या - त्या गावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही केले. त्यामुळे तालुक्यातील २०० पैकी १९२ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी अजूनही ८ महसुली गावांनी कोरोनाला गावात प्रवेश दिलेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा मार्च महिन्यात लागू झालेल्या संचारबंदीनंतर आजतागायत प्रशासन ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे.
तालुक्यातील खाडीपट्ट्यातील सवणस ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सवणस व मुळगाव या दोन्ही महसुली गावात अद्याप कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. या ग्रामपंचायतीत २९० कुटुंबे असून, लोकसंख्या १०४६ एवढी आहे. कर्जी, तुंबाड व चौगुले मोहल्ला या अन्य खाडीपट्ट्यातील तीन गावात कोरोनाचा प्रवेश ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मदतीने रोखला आहे. कर्जी गावात ३४४ कुटुंबे असून, लोकसंख्या १६९७ आहे, तर तुंबाडमध्ये २३१ कुटुंबे व ७०९ लोकसंख्या आहे. तुळशी खुर्द व बुद्रुकमध्ये २४२ कुटुंबे असून, लोकसंख्या ७७० आहे. या गावात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहकार्याने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या दुसरी लाटेतही हे गाव अबाधित राहिले आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जैतापूर या गावात २५० कुटुंबे व ७५१ लोकसंख्या असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत या गावाने कोरोनाला आपल्या गावात शिरकाव करू दिलेला नाही. ग्रामपंचायत, ग्रामकृती दल, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त प्रयत्नाने गेल्या दोन महिन्यांत तालुक्यात इतरत्र मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असतानाही जैतापूरवासीयांनी कोरोनाला आपल्या वेशीवर रोखून धरले आहे. भेलसई ग्रामपंचायतीत येणाऱ्या बौद्धवाडी या महसुली गावातही अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाला केलेले सहकार्य व घेतलेली काळजी, यामुळे या आठ गावांमध्ये अजूनही कोरोनाला शिरकाव करता आलेला नाही.
....................................
ग्राम कृती दलाने वाडीनिहाय काम केले. कोणी पाहुणा किंवा चाकरमानी गावात आला तरी त्याची चौकशी करून होम क्वारंटाईन केले जात होते. सरपंच, प्रशासन यांच्या सहकार्याने गावात सुरुवातीपासूनच जनजागृती केली गेली. तसेच ग्रामस्थांनीही सहकार्य करून सर्व नियमांचे पालन केले.
- विजया पवार - ननावरे, ग्रामसेविका, कर्जी
................................
ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळे जैतापूर गावात अद्यापपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. गावात येणारे चाकरमानी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून अलगीकरणात राहत आहेत. गावात जनजागृती व नियमित तपासणी यामुळे गाव कोरोना संसर्गापासून दूर राहिले आहे.
- विनोद तोडणकर, ग्रामसेवक, जैतापूर.