रत्नागिरी : भविष्यात जिल्ह्यात सनदी अधिकारी तयार व्हावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार या प्रयत्नांची पराकाष्टा करीत असून, त्यांनी जिल्हा परिषदेत युपीएस्सी, एमपीएस्सी मार्गदर्शन शिबिर भरविण्यास सुरुवात केली आहे. शासन नियम समोर ठेवून कामकाज करीत असतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजात सुसूत्रता आणली आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य, पाणी या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी डिजिटल स्कूलची संकल्पना आणली असून, ती प्रत्यक्षात उतरविली आहे. शासकीय कामकाज करीत असतानाच समाजासाठी काही तरी करुन दाखवण्याची उमेद वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कमीच असते. या जिल्ह्यात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी जाणून घेतले. ही भूमी रत्नांची खाण असून, येथील विद्यार्थी हुशार आहेत. त्यांना केवळ मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी त्यांनी येथील युवक-युवतीही सनदी अधिकारी निर्माण होण्यासाठी त्यांना युपीएस्सी, एमपीएस्सीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये टिकण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी मागील महिन्यामध्ये बारावी, पदवीधरांसाठी युपीएस्सी, एमपीएस्सी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. त्यासाठी त्यावेळी त्यांना अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी पुन्हा शनिवारी आयोेजित केले. युपीएस्सी, एमपीएस्सी मार्गदर्शन शिबिराला येथील उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी त्या शिबिरातच समाधान व्यक्त केले. देशभ्रतार यांनी केलेल्या प्रयत्नाला येथील विद्यार्थीही साथ देऊ लागले आहेत. जिल्ह्यात प्रथमच आयएएस अधिकारी असलेल्या देशभ्रतार यांनी सुरु केलेल्या अशा प्रकारच्या प्रयत्नाला यश मिळेल हे निश्चित आहे. त्यासाठी येथील विद्यार्थीही भविष्यात सनदी अधिकारी बनून देशात आपल्या कामाचा ठसा उमटवतील. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरु केलेले युपीएस्सी, एमपीएस्सी मार्गदर्शन शिबिरे यापुढेही सुरु राहणार आहेत. (शहर वार्ताहर)
सनदी अधिकारी निर्माण होण्यासाठी प्रयत्न
By admin | Updated: July 6, 2015 00:25 IST