दापाेली : दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये पर्यावरणशास्त्र व आयक्यूएसी विभागातर्फे ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशमूर्तीबाबत कार्यशाळेचे आयोजन केले हाेते.
कार्यशाळेच्या संयोजक प्रा. अमृता मोहिते यांनी मूर्तीशाळा कार्यशाळा केंद्राचे एकनाथ आचरेकर यांची ओळख करून दिली.
कार्यशाळेच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविल्या जातात. या मूर्तींचे पाण्यात विघटन होत नसल्याने आपोआपच जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून आपण सोप्या पद्धतीने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवू शकतो आणि पर्यावरणास हानी न पोहोचवता गणेशोत्सव जल्लोषात साजरा करू शकतो, याबाबत जागृत करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये एकनाथ आचरेकर यांनी उपस्थितांना सोप्या पद्धतीने शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करून दाखवली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.