रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात कोकण रेल्वेच्या टीमला यश आले आहे. या मार्गावरील ४६.८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, आता दुपदरीकरणामुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार आहे.
कोकण रेल्वे येणाऱ्या काळात अधिक गतिमान होत आहे. त्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर त्यादृष्टीने मार्ग दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. गेल्या काही काळात यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात कोकण रेल्वेच्या टीमला यश आले. दुपदरीकरणाच्या या कामावर ५३० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
रोहा ते वीर दरम्यानचे अंतिम टप्यात आलेले दुपदरीकरणाचे काम गेले सात दिवस ब्लॉक घेत पूर्ण करण्यात आले. या आठ दिवसांत रोहा ते वीर दरम्यानचे ट्रॅक जोडण्यात आले. या दोन स्थानकांदरम्यानचे ४६.८ किलोमीटरचे काम आता पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेचे अधिकारी, अभियंते आणि कामगार यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. कोकण रेल्वेच्या मार्गावरील वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेच्या अधिकारी, अभियंता यांच्यासह संपूर्ण टीमने आनंदोत्सव साजरा केला.
दुपदरीकरणाच्या कामांमुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार आहे. अगदी अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवापासूनच मार्गावर या दुपदरीकरणाचे फायदे दिसू लागतील. गणेशोत्सव नजरेसमोर ठेवून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशभक्त आता कमी वेळेत गावी पोहोचणार आहेत.
कोकण रेल्वे आता यापुढील दुपदरीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गावरील प्रवासात प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकारक होणार आहे.
..............
फोटो मजकूर
कोकण रेल्वेच्या मार्गावरील वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेच्या अधिकारी, अभियंता यांच्यासह संपूर्ण टीमने आनंदोत्सव साजरा केला.