रत्नागिरी : शिवसेना ही राज्यात सत्तारूढ पार्टी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इमेज सुसंस्कृत, संयमी, शांत आणि अभ्यासूपणा असा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला भावलेला आहे. त्यामुळे त्यांनी उतावळेपणा न दाखवता त्या पत्रातल्या दोन बोलक्या त्रुटी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिल्या. भाजपने परमबीर सिंगच्या पत्राच्या नावाने महाराष्ट्रात नंगानाच सुरू केला आहे. त्या भाजपच्या लक्षात आणून दिले गेले की, त्या पत्रावर त्यांची सहीच नाही. तसेच त्यांनी जो ई-मेल आयडी दिला आहे. तो त्यांचा ऑफिशियल नाहीच, या दोन बाबी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून समोर आणण्यात आल्या आहेत. याच्यातून महाराष्ट्राला काय तो संदेश गेलेला आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार भास्कर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनीही सांगितले की, दिल्लीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यानंतर ते मुंबईत गेल्यावर हे पत्र पब्लिश कसे काय झाले, हा तिसरा मुद्दा आहे. या पत्राबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी बोलतील, असेही आमदार जाधव यांनी सांगितले. भाजपच्या नैतिकतेबाबत ते म्हणाले की, नैतिकता कोणी शिकवायची. ज्यावेळेला अमित शाह गुजरातचे गृहमंत्री असताना त्यांच्यावर गुजरातचे पोलीसप्रमुख डी. जी. वंजारी यांनी याहीपेक्षा भयानक आरोप केले होते. त्यावेळी अमित शाह यांनी राजीनामा दिला होता का, तसेच गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी राजीनामा दिला होता का, असा प्रश्न आमदार जाधव यांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करून सर्वांची नावे दिली. प्रफुल्ल छेडा याचे नाव असून तो मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होता. अमित शहांना न्यायालयाने तीन वर्षे राज्याच्या बाहेर पाठवले. ते आज देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्यापैकी कोणी राजीनामा दिला. त्यामुळे नैतिकतेच्या गोष्टी भाजपाने करू नयेत, अशा शब्दात आमदार जाधव यांनी भाजपच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले.