मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्याला गुरुवारी अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. मेघगर्जनेसह मुसळधार कोसळलेल्या पावसाचा व वादळाचा आंगवली पंचक्रोशीतील गावांना चांगलाच तडाखा बसला. त्यामुळे आंगवली जनता विद्यालयाचे सुमारे २३ लाख २२ हजार रुपये इतके मोठे नुकसान झाले. तर बोंड्ये गावातील ४३ घरे व गोठ्याचे मिळून सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.ही माहिती देवरुख तहसील कार्यालयाच्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. गुरुवारी सायंकाळी अचानक मुसळधारेने कोसळलेल्या पावसाने तालुक्यात दाणादाण उडवून दिली होती. वीजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच धांदल उडाली होती. आंगवली पंचक्रोशीला तर या वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. शुक्रवारी ही वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.यामध्ये आंगवली जनता विद्यालयाच्या इमारतीचे सर्व पत्रे कैचीसह उडून गेले. तसेच पंखे, संगणक, संच, टेबल, वायरींग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बोंड्ये गावातसुद्धा अनेक घरांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे खांबही पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. धामणी येथील राघू बानू गावडे यांच्या घराचे १ लाख २ हजार २८० रुपये, तर रोशनी रामचंद्र पाताडे यांचे १ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले. नारडुवे ग्रामपंचायत शिपाई आत्माराम गोपाळ राणे हे वीजेच्या धक्क्याने जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळीसुद्धा पावसाने हजेरी लावली होती. मात्र, गुरुवारच्या तुलनेत पावसाचा वेग कमी होता. त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही कमी होता. दरम्यान अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फळांची गळ झाली आहे. (वार्ताहर)अवकाळी पावसाने लोक हैराण.पंचक्रोशीतील अनेक गावांना वादळी पावसाचा तडाखा.विद्युत खांब पडल्याने पुरवठा खंडित.परिसरातील घरे, गोठे व शाळेचे झाले नुकसान.विजेच्या धक्क्याने एकजण जखमी.
अवकाळी पावसाने २७ लाखांची हानी
By admin | Updated: April 18, 2015 00:10 IST