मार्लेश्वर : बारमाही पीक घेण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावाची या अभियानासाठी कृषी विभागाने नुकतीच निवड केली आहे. भात कापणीनंतर या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.कोकणात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कोकणातील शेतकरी शेतीवरच गुजराण करत असतो. मात्र, सद्यस्थितीत आजचा तरुणवर्ग शेतीकडे दुर्लक्ष करत असून, उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी मुंबई वा पुणे यांसारख्या शहरांकडे धाव घेत आहे. दुसरीकडे काही शेतकरी आजही आपला पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.शेतकरी शेती करुन आपली गुजराण करत असला तरी शेतकरी म्हणावा इतका आर्थिकदृष्ट्या सबल झालेला दिसत नाही. यासाठी शेतीला चालना मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, या उद्देशाने शासनाने अनेक विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यानुसार शेतकऱ्यांना बारमाही पीक घेता यावे, याकरिता शासनाने कोरडवाहू शेती अभियान राबवण्याचे ठरवले आहे. प्रत्येक तालुक्यातून या अभियानासाठी सुरुवातीला एका गावाची निवड करण्याचे शासनाचे धोरण आहे.यावर्षी हे अभियान तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या देवडे गावात राबवण्यात येणार आहे. हे अभियान राबवण्यासाठी देवडे गावातील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेर्डे यांनी पुढाकार घेतला आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी तालुका कृषी कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत कृषी विभागाने देवडे गावाची कोरडवाहू शेती अभियानासाठी निवड केली आहे. या अभियानांतर्गत गावातील ग्रामस्थांचे गट तयार करण्यात येणार असून, या गटांच्या सहायाने गावात विविध पिकांचे उत्पादन घेतले जाणार आहे. तालुका कृषी विभाग कमिटीने या गावाची प्रथमदर्शनी पाहणी केली ग्रामस्थांशी या अभियानासंदर्भात चर्चा केली आहे. भातकापणीचा हंगाम संपताच या अभियानाला प्रारंभ होणार आहे. (वार्ताहर)देवडे गावातील प्रगतशील शेतकरी प्रकाश बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी कांदा, हळद, कणगर, सूर्यफुलाची उन्हाळी शेती करुन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. आता बेर्डे यांच्या पुढाकारातून गावात कोरडवाहू शेती अभियान राबवण्याचा मान मिळाल्याने गावातील शेतकरी हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
देवडे गावात राबवले जाणार कोरडवाहू शेती अभियान
By admin | Updated: September 25, 2014 23:31 IST