कराड : चिपळूण मार्गावर खेर्डी ते पिंपळी दरम्यान सुरू असलेले काॅंक्रिटीकरणाचे काम सुरू असून, ते निकृष्ट दर्जाचे हाेत असल्याचे आराेप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी केला आहे. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कराड-चिपळूण मार्गावर खेर्डी ते पिंपळी दरम्यान रस्त्याचे काॅंक्रिटीकरण झाले आहे. या रस्त्यालगत काँक्रीटची बंदिस्त गटारे बांधण्यात आली. मात्र, ही गटारे कुचकामी ठरली आहेत. नव्याने उभारलेल्या गटारांना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. यावरून अवजड वाहने गेल्यास गटार कोसळू लागले आहे. गटारांचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी केला आहे.
चिपळूण-कराड मार्गावर गेल्या वर्षी बहादूरशेख नाका ते पिंपळी दरम्यान रुंदीकरण करण्यात आले. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे. दरम्यान, या राष्ट्रीय महामार्गावर वस्तींच्या भागात बंदिस्त गटारे उभारण्यात आली. बदादूरशेख नाका, खेर्डी व सती चिंचघरी दरम्यान गटाराचे बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची ठरली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी एक बोलेरो गाडीही गटारात अडकली. यावरून निकृष्ट कामाचा नमुना दिसतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
खेर्डीत शहरीकरण वाढते आहे. गावाला लागूनच औद्योगिक वसाहत आहे. बांधकामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी नियमित अवजड वाहतूक सुरू असते. काही ठिकाणी बंदिस्त गटारावरून नियमित अवजड वाहतूक होणार आहे. याची माहिती असतानाही ठेकेदाराने गटाराचे काम मजबूत केलेले नाही. या निकृष्ट गटारांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे.