रत्नागिरी : कामगार-कर्मचारी यांना कोविड लस घेण्याची सक्ती करू नये, याबद्दलचे निवेदन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व इतर विभागातील विभागप्रमुख यांना कोरोना लस घेण्याची सक्ती केली आहे.
शिमगोत्सवाची सांगता
राजापूर : तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण रोंबट म्हणून प्रसिध्द असलेल्या शहरातील दिवटेवाडी येथील पवार मंडळाच्या शिमगोत्सवातील कार्यक्रम कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक रूढीनुसार साधेपणाने पार पडला. रोंबटाने शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली. शहरातील पवार मंडळ दिवटेवाडी या मंडळाने शिमगोत्सवाची परंपरा पिढ्यानपिढ्या जपली आहे.
शैक्षणिक साहित्याचे वाटप
गुहागर : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलादेवी ग्रामविकास मंडळ, मुंबई विश्वस्त मधुचंद्रा मुख्योध्यामतर्फे गावातील माध्यमिक विद्यालय व प्राथमिक केंद्रीय शाळा क्रमांक १ येथे माेफत वह्या वाटप करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे दोन दिवशीय मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. गणित विषयाचे तज्ज्ञ सचिन साळवी यांनी मार्गदर्शन केले.
साैर पथदीप बंद
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायतीने बसविलेले साैर पथदीप शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. ग्रामपंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जंगलमय भाग असल्याने अनेक पथदीप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडत जावे लागत आहे. ग्रामपंचायतींकडून तातडीने पथदीप सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
खरीपचे नियोजन रखडले
रत्नागिरी : जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून शासनाने ग्रामस्तरावर ग्राम कृषीविकास समितीतर्फे खरीप नियोजन करण्याचे धोरण आखण्यात आले होते. जिल्ह्यातील ७६१ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम कृषीविकास समित्या स्थापन झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतीविषयक विकास कसा होणार, असा प्रश्न अधिकाऱ्यांसह नागरिकांना पडला आहे.
रस्त्याच्या कामाला मंजुरी
खेड : तालुक्यातील दुर्गम भागातील खवटी धनगरवाडी रस्त्यांसाठी आ. योगेश कदम यांनी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे दुर्गमवाडीच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ज्येष्ठ शिवसैनिक राम गवळी, ग्रामपंचायत सदस्य शाम गवळी, सुधाकर दरेकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी आ. कदम यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या वाडीला भेट देऊन रस्त्याची पाहणी केली.
दारूबंदीसाठी निवेदन
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात खुलेआम होत असलेली दारूविक्री थांबविण्यासाठी स्थानिकांनी पोलीस अधीक्षक डाॅ.मोहितकुमार गर्ग यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राजिवली ग्रामपंचायत हद्दीतील रातांबी पुलावर गावठी दारूची विक्री होत असल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.
उष्म्यामुळे पाणीटंचाई
रत्नागिरी : तापमानवाढीबरोबरच दोन दिवस मळभ दाटून येत असल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. वाढत्या उष्म्यामुळे अनेक भागांत पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागल्याने टँकरची मागणी वाढू लागली आहे. शहरानजीक असलेल्या कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी आदी भागात पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
शेतमालाची विक्री ‘ई-नाम’द्वारे
रत्नागिरी : कृषी उत्पादनाची थेट विक्री करणारी ई- नाम प्रणाली अधिक सक्षम करताना शेतकऱ्यांना आता शेतमालाची थेट विक्रीची सुविधा उपलब्ध झाली आहे. कोरोनाकाळात थेट संपर्क टाळण्यासाठी आता ई- नाम प्रणाली प्रभावशाली करताना बाजारातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कृषी माल विक्री ऑनलाईन करण्यात येणार आहे.
कोकणी मेवा विक्रीला
रत्नागिरी : ग्रामीण भागातून कोकणी मेवा विक्रीसाठी येऊ लागला आहे. आंबे, काजूगर, कुयरी, फणसाचे गरे, पालेभाज्या, काळे तीळ, कैऱ्या, रामफळे, जाम, काजू , चिकू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हंगामी फळे, भाज्यांना ग्राहकांकडून मागणी होत आहे. फणसाचे गरे किलो तसेच वाट्यावर विक्रीसाठी येत आहेत. काजूगरांना विशेष मागणी होत आहे.